आ.मंगेश चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपच्या अभुतपुर्व चक्काजाम आंदोलनाने चाळीसगाव दणाणले

लवकरात लवकर राजकीय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवा अन्यथा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही –
चाळीसगाव येथील अभूतपूर्व चक्काजाम आंदोलनात भाजपा व ओबीसी समाजाचा राज्य शासनाला इशारा

विस्थापित गावगाडा मोठा होऊ नये यासाठी प्रस्थापित राजवाड्याने मराठा ओबीसी आरक्षण विषय पेटता ठेवण्याचे कारस्थान – आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप

आंदोलकांचा संवेदनशीलपणा, रुग्णवाहिकेसाठी केला मार्ग मोकळा 

चाळीसगाव प्रतिनिधी - राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संकटात आले, त्यात आरक्षण रद्द झालेल्या ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून पोटनिवडणुका लावून जखमेवर मीठ चोळण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. लवकरात लवकर राजकीय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्य शासनाने सोडवावा अन्यथा ओबीसी समाज महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा चाळीसगाव येथे चक्काजाम आंदोलन प्रसंगी भारतीय जनता पक्ष व ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या अभूतपूर्व असे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

चक्काजाम आंदोलन प्रसंगी आपली भूमिका मांडताना मंगेशदादा चव्हाण महाविकास आघाडी सरकार वर जोरदार टीकास्र सोडले, सामाजिक समानतेसाठी आरक्षणाची सुरुवात करून छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील असमानतेची दरी कमी केली होती, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने ही दरी पुन्हा एकदा वाढली आहे. समाजातील नेतृत्वगुण पुढे आणण्याचे काम आरक्षणाने केले मात्र राजकीय आरक्षण संपत असल्याने ओबीसी समाज आज अस्वस्थ आहे. दोन गटात तेढ निर्माण करायची व आपली राजकीय पोळी शेकायची असे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. तीनही पक्ष आमदार मोजण्यात व सांभाळण्यात व्यस्त होते मात्र मात्र सर्वोच्च न्यायालयाने तब्बल ९ वेळा मागूनही ओबीसींची लोकसंख्या व माहिती सरकारला देता आली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील अशीच वेळकाढू भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने ते देखील रद्द झाले. भाजपाचा डीएनए संघर्षाचा आहे, मराठा ओबीसींच्या हक्कासाठी भाजपा कायम रस्त्यावर उतरेल, आमची बांधिलकी सत्तेशी नसून जनतेशी आहे. ओबीसी समाजाच्या जीवावर वडेट्टीवार, भुजबळ, पटोले आदी नेते प्रस्थापित झाले मात्र जर राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून इतर विस्थापित ओबीसी समाज मोठा होऊन त्यातून नेतृत्व निर्माण होईल व आपल्या खांद्याला खांदा लावून उभा राहील अशी भीती त्यांना वाटत असल्याने त्यांनी मुद्दामहून ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला.
सदर चक्काजाम आंदोलनाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी  साळुंखे,  उद्धवराव माळी, प्रेमचंद खिवसरा, नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, प्रा.सुनील निकम, घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेविका विजया प्रकाश पवार, नगरसेविका विजयाताई भिकन पवार, विश्वासभाऊ चव्हाण, नगरसेवक चिराग शेख, चंद्रकांत तायडे, नितीन पाटील, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, अभिषेक मोरे, माजी पंचायत समिती सदस्य व ओबीसी नेते जगन्नाथ महाजन, सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीश बराटे, अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व भाजपा नगरसेवक, भाजपा ओबिसी मोर्चा तालुकाध्यक्ष निलेश पाटील व सर्व ओबीसी मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
के बी साळुंखे, संजय रतनसिंग पाटील, प्रा.सुनील निकम, संजय भास्करराव पाटील यांनी मनोगताच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा ओबीसींच्या मागे खंबीरपणे उभा असून पुढील काळात प्रदेशावरून जो काही आदेश येईल त्याप्रमाणे आंदोलन उभारण्याचे आश्वस्त केले.
आंदोलनाप्रसंगी अनेक ओबीसी नेत्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओबीसी नेते व भाजपा माजी पदाधिकारी उद्धवराव महाजन यांनी ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने फुले, शाहू, आंबेडकर आदी महापुरुषांच्या विचारांचा खून झाल्याचे सांगितले तर महात्मा फुले युवा मंच व युवा मोर्चा पदाधिकारी दिनेश माळी यांनी तरुणांना राजकारणात संधी नाकारली जाईल त्याचा आगामी काळात विपरीत परिणाम समाजावर होईल अशी भीती व्यक्त केली. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य व शहराध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भावेश कोठावदे, नगरसेवक चंदू तायडे व नगरसेवक चिराग शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ओबीसी समाजाचा संयमाचा अंत पाहू नये, आरक्षणामुळे साळी – माळी – कोळी यांना राजकारणात संधी मिळाली. ओबीसी आरक्षण रद्दमुळे मुस्लीम समाजाचे देखील मोठे नुकसान झाले मात्र त्यांना अजून जाणीव नाही, ओबीसी आरक्षणामुळे आज माझ्यासारखा गॅरेज कारागीर नगरसेवक होऊ शकला असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तर भाजपचे जेष्ठ नेते विश्वास चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारतर्फे घटनेला नख लावण्याचे व सर्व समाज घटकांना खाईत लोटण्याचे काम केल्याचा आरोप केला.

चक्काजाम आंदोलनप्रसंगी आंदोलकांची संवेदनशीलता, रुग्णवाहिकेला केला मार्ग मोकळा

चाळीसगाव येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित चक्काजाम आंदोलनामुळे चारही बाजूला २ ते ३ किमी पर्यंत वाहतूक जाम झाली होती. आमदार मंगेश चव्हाण यांचे भाषण सुरु असताना अचानक एक रुग्णवाहिका त्या मार्गाने जात असल्याने आंदोलकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून दिली. शिस्तप्रिय आंदोलकांनी संवेदनशीलता दाखवत घेतलेल्या भूमिकेने पोलीस प्रशासनासह उपस्थित सर्व नागरिकांनी कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व