जळगावातील भाजप नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर? मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता???
जळगाव प्रतिनिधी |मुंबईत राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीत रणनीती आखली जात असल्याची सुत्रांची माहीती.
भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. खडसेंना पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात चर्चा सुरू असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील अजून नेमके कोण कोणते नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर इत्यादी नेते उपस्थित आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांचं म्हणणं ऐकून घेऊनच भाजपच्या या बड्या नेत्याला पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठीच पवारांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात खलबतं सुरु आहेत.अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे भाजपामध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते.स्वता खडसे यांनी देखील अनेक वेळा पक्षातील काही नेत्यांविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.सुनील नेवे लिखीत 'जनसेवेचा मानबिंदू-एकनाथराव खडसे' या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात देखील खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला जबाबदार धरून त्यांच्यावर आरोप केले होते.
खडसेंना पक्षात प्रवेश देण्यात आल्यानंतर बदलणारी समिकरणं,फायदे,तोटे तसेच त्यांना मंत्रीमंडळात स्थान द्यायचे की संघटनात्मक जबाबदारी देऊन पक्ष विस्तार मजबूत करण्यासाठी एखादी मोठी जबाबदारी द्यावी यावर राष्ट्रवादी काँग्रेस मधे जोरदार हालचाली सुरू आहेत.खडसे राष्ट्रवादी मध्ये आल्यास जळगाव जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात मोठा फायदा होईल यावर देखील राष्ट्रवादी चे नेते चर्चा करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
Comments
Post a Comment