Breaking News बाळासाहेब थोरात यांनी दिला विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा; कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर???
महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या गोट्यात मोठ-मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असून नाराजी, बंडखोरी, गटबाजी असं सर्व काही घडताना दिसत आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यापासून काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर निवडणुक विजयी झाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी घेतलेल्या पत्रपरिषदेतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबद्दलची नाराजी थेट जाहीर झाली होती. तांबेंनी केलेल्या बंडखोरीपासून बाळासाहेब थोरातांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला त्याला थोरात यांची समंती आहे का? असे सवाल उपस्थित होत होते. अखेर काही दिवसांपूर्वी थोरातांनी नाराजीचे पत्र लिहून नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या राजकारणाने व्यथित झाल्याचे सांगितले.
नाराजीच्या पत्रानंतर थोरात यांचे काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पद अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली. नाशिक पदवीधर निवडणुकीतील निष्क्रियता आणि नाना पटोले यांच्यासोबतचा वाद या पार्श्वभूमीवर पक्षाकडून ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. पण अशातच बाळासाहेब थोरात यांनी स्वतःहून विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांकडे दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दिल्ली हायकमांड काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे असेल.
Comments
Post a Comment