रुग्णसंख्या एक नंबरवर असतांना देखील चाळीसगावात खासगी क्लासेस फुल्ल? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करुन लाखोंची उलाढाल; यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करुन लाखोंची उलाढाल;यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा
संदिप पाटील चाळीसगाव: जिवघेण्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत चाळीसगाव तालुका गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एक नंबरवर असतांना देखील चाळीसगाव शहरात खाजगी कोचिंग क्लासेस शासनाचे नियम पायदळी तुडवून व विनापरवानगी जोरात सुरु झालेले दिसत आहेत.
शासनाने कोरोनासंदर्भात कडक निर्बंध घातले असून विविध गोरगरीब व्यवसायिक,हातमजूरी करणारे गरीब लोक, फेरीवाले तसेच लहान मोठे टपरीधारक यांना नियम पाळण्याची सक्ती केली जात असून बिचारे हातावर पोट असतांना एकवेळ उपाशी राहून देखील प्रशासनाला नियम पाळून सहकार्य करीत आहेत.मात्र विना परवानगी वर्षाला लाखो रुपयांची कमाई करणारे खासगी क्लासेस चालकांना या कोरोना नियमांमधून सुट देण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोणाच्या आशिर्वादाने क्लासेस सुरू आहे? परवानगी दिली कोणी?
कोरोना रुग्णसंख्या व संभाव्य तिसरी लाट या गोष्टींचा विचार करून शासनाने निर्बंध घातले असून अजूनपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहेत.परंतु एकेका खासगी क्लासेस मधे मात्र शेकडो विद्यार्थ्यांची रोज गर्दी जमवली जात असून खासगी क्लासेस चालकांचे खिसे भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तसेच शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे.
हे विनापरवानगी खासगी क्लासेस चालक नेमकं कोणाच्या आशिर्वादाने हिंमत करत आहेत? यांनी कोणाकडून परवानगी घेतली आहे? यांना शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला आहे?? यांना परवानगी आहे मग गोरगरीब छोट्या व्यावसायिकांना निर्बंध का?? यामागे काही अर्थकारण तर नाही ना?? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून संबंधित शिक्षण विभाग, नगरपरिषद तसेच पोलीस प्रशासन यांनी त्वरित या विनापरवानगी सुरू असलेल्या खासगी क्लासेस चालकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment