राज्यसरकारने मराठा समाजासाठी काहीच केले नाही - खा.संभाजीराजे छत्रपती
मराठा समाजासाठी या राज्यसरकारने काहीच नाही केलं, जे आहे ते सर्व मागच्या फडणवीस सरकारने केलं आहे-संभाजीराजे छत्रपती
खान्देश न्युज नेटवर्क- नांदेड येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा व्यासपिठावरुन बोलतांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मराठा आरक्षण उपसमिती चे अशोक चव्हाण यांच्यावर जळजळीत टिका केली आहे.
केंद्र सरकार ने ५०% आरक्षण मर्यादा ५२% पर्यंत वाढवली पाहिजे हि गोष्ट १००% खरी आहे परंतु त्यासाठी राज्य सरकारने अगोदर सर्व कायदेशीर पुर्तता करुन मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.तरच पुढिल गोष्टी करणं शक्य आहे.परंतु राज्य सरकारची मानसिकता आहे का? असा प्रश्न यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षण समन्वय समिती आणि मंत्रीमंडळ समीतीची बैठक झाली होती आणि त्यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा करून आश्वासन दिले होते.परंतु आज दोन महिने उलटुन गेल्यानंतर देखील त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.याचा अर्थ हे सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे का? मराठा विद्यार्थींसाठी राज्यात २४ वसतीगृहे बनविण्यात येतील व त्यांचे उद्घाटन १४ किंवा १५ ऑगस्ट रोजी करु असं आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात मात्र काहीही झालं नाही. फक्त ठाणे येथे एकनाथ शिंदेंनी वैयक्तिक लक्ष घालून एक वसतीगृहाचा शुभारंभ केला आहे.बाकिचे २३ वसतीगृहे कुठे आहेत? असा रोखठोक सवाल यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.
जे वसतीगृहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार सांगत आहे ते सर्व फडणवीस सरकारने केले आहेत मग या सरकारने मराठा समाजासाठी काय केलं? ते त्यांनी जाहिरपणे सांगावं असं थेट आवाहन राज्य सरकारला यावेळी संभाजीराजेंनी दिलं आहे.
नांदेडचे सुपुत्र आणि मराठा आरक्षण उपसमिती चे अशोक चव्हाण कुठे आहेत?
दरम्यान यावेळी नांदेड येथे मराठा आरक्षण आंदोलन सुरू असुन देखील ना.अशोक चव्हाण त्याठिकाणी आले नसल्याने खा.संभाजीराजेंनी चांगलीच खरपुस टिका केली. ते म्हणाले की कोल्हापूर येथे मोर्चा झाला त्यावेळी मंत्री सतेज पाटील यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी व वडील देखील मोर्चात सहभागी झाले होते व सर्वसामान्य नागरिकांमध्ये बसले होते.त्यानंतर नाशिक येथे देखील मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व आमदार खासदार उपस्थित होते. परंतु मराठा आरक्षण उपसमिती चे अध्यक्ष आणि नांदेड चे मंत्री मात्र त्यांच्याच नांदेड मध्ये मराठा मोर्चाकडे पाठ फिरवतात? ही खुप मोठी शोकांतिका आहे असं देखील यावेळी संभाजीराजे म्हणाले.
Comments
Post a Comment