निकष न लावता पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे चाळीसगाव पूरग्रस्तांना मदत जाहीर करा - आ.मंगेश चव्हाण

निकष न लावता पश्चिम महाराष्ट्रासाठी लावलेल्या दरांप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी - आमदार मंगेश चव्हाण

खान्देश न्युज नेटवर्क चाळीसगाव - चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक आलेल्या पुरात १८ ते २० गावे बाधित झाली असून आतापर्यंत पुरामुळे ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ७०० ते ८०० गुरे, हजारो घर पाण्याखाली गेल्याने ही सर्व कुटुंब उघड्यावर आली आहे.
       आज सकाळी ५.३० वाजेपासून मी स्वतः बाधित गावांपर्यंत पोहोचून प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधत आहे. माजीमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांनी देखील परिस्थितीची माहिती मिळताच तात्काळ चाळीसगाव गाठत दिवसभर थांबून पूरग्रस्तांना धीर दिला. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे, पंचायत समितीचे गटनेते संजय तात्या पाटील, नगरपालिका गटनेते1 संजय रतनसिंग पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह औरंगाबाद - चाळीसगाव महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी पाहणी करून मदतकार्याची माहिती घेतली. तद्नंतर पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी देखील चाळीसगाव येथे भेट घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. वाकडी, वाघडू, रोकडे, जावळे या गावांना प्रत्यक्ष भेट दिली तसेच इतर गावातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत देखील सातत्याने संपर्कात होतो. न भरून निघणारे नुकसान चाळीसगाव तालुक्यात झाले असून कुणाचे पोल्ट्री फार्म तर कुणाची दुचाकी - चारचाकी वाहने वाहून गेली. कमी वेळात प्रचंड पाऊस (Flash flood), ढगफुटी (cloudburst) या सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अवघी जमीन वाहून गेली. पिकांचं तर अतोनात नुकसान झालं. मी पालकमंत्री महोदय यांच्यासह जिल्हाधिकारी यांना विनंती केली की, चाळीसगाव तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, निकषांच्या जाचात न अडकता २०१९ व २०२१ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे  पूरग्रस्तांना तात्काळ अन्नधान्य, रोख स्वरूपात मदत देण्यात आली तसेच वाढीव दरांनुसार नुकसानीची भरपाई देण्यात आली त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यासाठी देखील मदत जाहीर करण्यात यावी अशी आग्रही मागणी मी केली आहे. पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व माजी पालकमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांनीदेखील मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत या गंभीर परिस्थितीची माहिती त्यांना दिली. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. राहिलेल्या इतर गावांमध्ये देखील भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी आम्ही करणार आहोत. पूरग्रस्तांना अन्न व पाणी पुरविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सकाळपासून यंत्रणा कार्यरत झाली असून चाळीसगाव तालुक्यातील इतर राजकीय - सामाजिक संघटना देखील आपापल्या पातळीवर मदतकार्य करत आहेत. ही वेळ रडण्याची नसून लढण्याची आहे. ही वेळ राजकारणाची नसून पूरग्रस्तांना सावरण्याची आहे. आपण सर्व मिळून या संकटाचा सामना करूया व आपल्या चाळीसगाव शहरासह तालुक्याला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करूया.
- आमदार मंगेश रमेश चव्हाण, चाळीसगाव
उद्या होणा-या मंत्रीमंडळ बैठकीकडे पुरग्रस्तांचे लागले आहे लक्ष; पालकमंत्री आणणार जास्तीत जास्त निधी??

दरम्यान चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज चाळीसगाव येथे पाहणीदरम्यान दिले आहे. यावेळी पालकमंत्री ना.पाटील तसेच माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी थेट मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत दुरध्वनी वरुन चर्चा केली असता उद्या होणा-या मंत्रीमंडळ बैठकीत मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
     चाळीसगाव येथील आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी देखील सरकारकडे मदतीची मागणी केली असुन निकषांच्या गुंतागुंतीत न अडकवता नुकसानग्रस्तांना तातडीने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मदत मिळावी अशी अपेक्षा आ.मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. दिलेल्या आश्वासनुसार आता चाळीसगाव पुरग्रस्तांना किती मदत दिली जाते याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व