पुन्हा राजकीय भूकंप?? शरद पवार तातडीने दिल्ली रवाना; फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील दिल्लीत असल्याने चर्चेला उधाण
पुन्हा राजकीय भूकंप?? शरद पवार तातडीने दिल्ली रवाना; फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील दिल्लीत असल्याने चर्चेला उधाण
मुंबई प्रतिनिधी: दोन वर्षांपूर्वी च्या पवार-फडणवीस शपथविधी च्या आठवणी ताज्या असतानाच आज राज्यात विविध घडामोडी घडतांना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील सर्वच नियोजित कार्यक्रम सोडून ते दिल्लीत जात आहेत.चर्चेचा विषय म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार राजनाथसिंहांची घेणार भेट?
आपल्या दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचंही बोललं जात आहे. मात्र नेमकं कारण काय आहे हे मात्र समजू शकले नाही.
दरम्यान दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं सुरु आहेत. दोन्ही नेते भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे राज्यातील सर्वच प्रमुख नेते येत्या काही दिवसांत भाजपाची सत्ता येणार असे भाकीत वारंवार करीत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की येत्या २०२२ या नविन वर्षात राज्यात नवीन सरकार पहायला मिळणार आहे. काल परवा तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी येत्या मार्च महिन्यात राज्यात भाजपचे सरकार स्थापन होत असल्याचे जाहीर केले आहे.यामुळे आजच्या घडामोडींवर राजकीय विश्लेषकांचे बारीक लक्ष असून या भेटीगाठीनंतर राज्यात पुन्हा काही राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment