विज समस्येच्या विरोधात आ.मंगेश चव्हाण यांचा चलो जळगाव चा नारा
चाळीसगाव प्रतिनिधी: महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना होत असलेल्या विजेच्या त्रासाला कंटाळून व विज समस्येला कंटाळून गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चाळीसगाव येथील भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी चलो जळगाव चा नारा दिला आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनचे वीज कनेक्शन कट करण्यात येत आहे व अघोषित लोडशेडींग करुन तासंतास वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. या विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून याविरोधात भारतीय जनता पार्टी च्या वतीने जळगाव येथे माजी पालकमंत्री आ.गिरिश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दि.१२ एप्रिल रोजी भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात चाळीसगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी सहभागी होऊन या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन चाळीसगाव येथील भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. यावेळी बोलताना आ.मंगेश चव्हाण म्हणाले की काही दिवसांपूर्वी विजेच्या समस्येसंदर्भात मी तालुक्यातील शेतकऱ्यांसह जळगाव येथे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले असता माझ्यासह तीस शेतकऱ्यांना या महाविकास आघाडीच्या राज्य सरकारने बारा दिवस जेलमध्ये कोंडून ठेवले व शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.
आता मात्र या सरकारने कहर केला असून चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन जळगाव येथे आमचे नेते आ.गिरिश महाजन यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आणि यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ.मंगेश चव्हाण यांनी केले आहे.


Comments
Post a Comment