चाळीसगाव जवळ भीषण अपघात; भरधाव कंटेनरच्या धडकेत प्राचार्य ठार
किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी : भरधाव कंटेनरच्या जोरदार धडकेत प्राचार्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना काल सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास धुळे रोडवरील शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजजवळ घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव-धुळे महामार्गावर साई वैभव हॉटेल च्या पुढे काल सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान भरधाव वेगाने कंटेनरच्या धडकेत चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील रहिवासी व धुळे रोड वरील शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेज चे प्राचार्य दिपक आधार पाटील (वय ४५) यांचं जागीच निधन झाले आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.मयत दिपक पाटील यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तत्पूर्वी सदर कंटेनरला (क्र. आर.जे- १४ जीजे ८५०८) ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव धुळे रस्त्यावर चाळीसगाव ते मेहुणबारे दरम्यान अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना जिव गमवावा लागत आहे. यावर लवकरात लवकर काही तरी मार्ग काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Post a Comment