धक्कादायक: गेल्या २४ तासात वाढली महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी कोरोना रुग्णसंख्या
धक्कादायक: गेल्या २४ तासात वाढली महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी कोरोना रुग्णसंख्या
टिम खान्देश न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात कोरोना थैमान घालताना दिसत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात २४ तासांत २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे रुग्णवाढीचा हा आकडा महाराष्ट्राने आजवर नोंदवलेला सर्वाधिक आकडा आहे. गेल्यावर्षी जेव्हा जगभर सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु होता तेव्हादेखील महाराष्ट्राने कधी २४ तासांत २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदवली नव्हती.
गुरुवारी भारतात कोविडचे ३५,८७१ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्येच्या बाबतीत गेल्या १०२ दिवसांमधली ही सर्वाधीक वाढ आहे. या नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात नोंदवली गेली. गुरुवारी महाराष्ट्रात २५,८३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आजवर महाराष्ट्रात २४ तासांत नोंदवलेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. गेल्या वर्षी जेव्हा जगभर कोरोना फोफावला होता तेव्हा महाराष्ट्रात ११ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली होती. तो आकडा २४,८८६ इतका होता. गुरुवारी महाराष्ट्रात नोंदवलेल्या रुग्णसंख्येने हा आकडा पार करत एक नवा रेकॉर्ड केला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात १२,७६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात सातत्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार का? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले असून काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेतृत्वानेही अनेकदा लॉकडाऊन संदर्भातील इशारा दिला आहे.
राज्य सरकारला कोरोनाचे गांभीर्य नाही,लसीकरणात मागे-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार लसीकरण मोहिमेला गांभीर्याने घेत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. गुरुवारी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवलेल्या लसी आणि महाराष्ट्रात आजवर झालेले लसीकरण यावर बोट ठेवत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Comments
Post a Comment