शासनाचे डोकं ठिकाणावर आहे का? गिरीश महाजन यांचा संतप्त सवाल
खान्देश न्यूज नेटवर्क: राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर झाला असून सरकार मात्र डोळे झाकुन झोपा काढत आहे. कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, शेतकऱ्यांच्या शेतातील, घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे, आंदोलन करणार्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे, बलात्कार व हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.अशा परिस्थितीत सरकार मात्र झोपा काढत असून सरकारला या गोष्टींचे काहीच कसे वाटत नाही? या शासनाचे डोकं ठिकाणावर नाही की काय? अशी गंभीर टिका आज माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आ.गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन जवळपास दहा दिवसांनी आज पत्रकारांसमोर आले.त्यांनी आज कोवीड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.यावेळी आ.महाजनांसोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे व आ.चंदुलाल पटेल उपस्थित होते.
जामनेर येथील ७०० कोरोना रिपोर्ट सात दिवसांपासून खोळंबले
जामनेर तालुक्यातील जवळपास ७०० पेक्षा जास्त रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट ७-८ दिवसांपासुन खोळंबले असुन स्वॅब घेतल्यानंतर ७-८ दिवस जर रिपोर्ट येत नसतील तर रुग्णांवर उपचार करणार तरी कसे? असा प्रश्न उपस्थित होत असुन कोरोना येऊन एक वर्ष झाले तरी शासनाने अजुनही कोरोना रोखण्यासाठी कोणतीच तयारी केली नसुन कोवीड रुग्णांसोबतच नॉन कोवीड रुग्णांना देखील वेळेवर उपचार मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण जास्त वाढले आहे.हॉस्पिटल बाहेर रुग्णांना ४-५ तास रुग्णवाहिकेत पडून रहावे लागते व त्यातच अनेकांचा जीव जात आहे असंही आ.महाजन म्हणाले.
कोरोणा झाल्यामुळे गेले 10 दिवस मी मुंबई येथील सरकारी सेन्ट जॉर्ज रुग्णालयात दाखल होतो, कोरोणा चाचणी निगेटिव्ह आल्याने काल रुग्णालयातून सुटी मिळाली.आज सकाळी घरी आल्यावर दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची हेळसांड होत असून परिस्थिती गंभीर आहे.यासाठी आज जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट दिली.
सद्य परिस्थिती व यासाठी आपणाला काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या.रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत, रिपोर्ट्स यायला वेळ लागत आहे, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. गेले अनेक महिने डॉक्टर व कोरोनायोध्यांचे पगार नाहीत. पीएम केअर्स मधून उपलब्ध झालेल्या 80 व्हॅनटीलेटर्स पैकी फक्त 40 चा वापर सुरू आहे. नॉन कोव्हीड रुग्णांना जागा नाही. यासारख्या अनेक समस्यांनी जिल्ह्याला ग्रासले आहे.जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन शिस्तबद्ध नियोजन करण्याची नितांत आवश्यकता आहे असं मत पत्रकारांसोबत बोलताना माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
ईडीची नोटीस आली की खडसेंना कोरोना होतो?
गिरीश महाजनांसारख्या तरुण, युवा नेत्याला कसा काय कोरोना होतो? या एकनाथ खडसे यांच्या आरोपावर बोलताना आ.महाजन म्हणाले की मी १० दिवसांपासून सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो व माझ्या संपुर्ण परिवारातील सदस्यांना कोरोना होऊन गेला आहे.कोरोना तरुण किंवा म्हातारा असा भेदभाव न करता तो सर्वांना होत आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडी ची नोटीस आल्यावरच कोरोना होतो.आणि ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे खोटे बिलं दाखवून मुंबईमध्ये फिरत असतात असा खळबळजनक दावा आ.गिरीश महाजन यांनी केला आहे.
Comments
Post a Comment