10 दिवसांचा लॉकडाऊन?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या देत आहेत मराठी वृत्तवाहिन्या
10 दिवसांचा लॉकडाऊन?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याच्या बातम्या देत आहेत मराठी वृत्तवाहिन्या
खान्देश न्यूज नेटवर्क: संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात दहा दिवस लॉकाडऊन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून त्यात राज्यात 10 दिवस सक्तीचा लॉकडाऊन करण्यावर खलबतं सुरू आहेत, असं सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त काही मराठी वृृृत्तवाहिन्या देत आहेत.
राज्यातील कोरोना संसर्गाचा कहर निर्माण झाला असून परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात सक्तीचा दहा दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यावर चर्चा करण्यात येत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन केल्याने त्याचे चांगले परिणाम आले आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यास कोरोना रुग्णसंख्या रोखता येणं शक्य होईल. तसेच लोकांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचीही जाणीव होईल. शिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणलं जाणार असल्याचंही या बैठकीत मांडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राष्ट्रवादीचा पाठिंबा, काँग्रेसचा विरोध?
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादीने दहा दिवसाच्या लॉकडाऊनला पाठिंबा दिला आहे. खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊन लागू करण्याबाबत पाठिंबा दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, दुसरीकडे काँग्रेसने बैठकीत लॉकडाऊन लागू करण्यास विरोध केला असला तरी लॉकडाऊन लागू करण्यावरून काँग्रेसमध्येही दोन प्रवाह असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन आणि नव्या नियमावली बाबतची अधिकृत माहिती मिळणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
उद्योजक, सिनेजगताशी करण्यात आली चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून समाजातील विविध घटकांशी संवाद साधला आहे. जीम मालक, हॉटेल व्यावसायिक, पत्रकार, संपादक, उद्योजक आणि फिल्मी जगतातील मान्यवरांशीही त्यांनी चर्चा केली आहे. त्यातून त्यांना अनेक सूचना आल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या सर्व घटकांना कोरोनाची परिस्थिती आणि त्याचं गांभीर्यही समजून सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आज काय निर्णय घेतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Comments
Post a Comment