गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, ठाकरे सरकारची सव्वा महिन्यात दुसरी विकेट

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा, ठाकरे सरकारची सव्वा महिन्यात दुसरी विकेट

खान्देश न्यूज नेटवर्क: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले असून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देणार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं मलिक म्हणाले.

नैतिकतेतून राजीनामा?

सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे

देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

राजीनामा पत्रं, जसंच्या तसं

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती

आपला
अनिल देशमुख

आज काय घडलं?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व