भाजपाच्या विजयाचे फटाके फोडत असतांनाच आ. मंगेश चव्हाणांनी चाळीसगाव राष्ट्रवादीच्या गोटात लावला बॉम्ब
चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी कोषाध्यक्ष, ब्राम्हणशेवगे गावाचे सरपंच, माजी मार्केट संचालक हेमराज (पिंटूदादा) बाविस्कर यांचा भाजपात प्रवेश
चाळीसगाव प्रतिनिधी : एकीकडे देशातील चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सगळीकडे विजयाचे फटाके फोडले जात आहेत. मात्र विजयाचे फटाके कमी की काय याच दिवशी चाळीसगाव तालुक्यात भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या गोटात बॉम्बच फोडला आहे. चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान तालुका कार्याध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व ब्राम्हणशेवगे गावाचे सरपंच आणि विकास सोसायटी तसेच दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन हेमराज उर्फ पिंटूदादा बाविस्कर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात देखील चांगला जनसंपर्क असणारा एक मोठा चेहरा हेमराज उर्फ पिंटूदादा बाविस्कर यांच्या रूपाने भाजपात आल्याने चाळीसगाव राष्ट्रवादीला हादरा बसला असून आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाला बळ मिळाले आहे.
सदर प्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव बापू पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सरदारशेठ राजपूत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, मार्केट माजी संचालक विश्वजित भैय्या पाटील, भाजपा तालुका चिटणीस रत्नाकर पाटील, हर्षल चौधरी, राम पाटील, कैलास नाना पाटील, योगेश राजपूत आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment