नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आ.मंगेश चव्हाणांच्या स्वाक्षरी मोहीमेला राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांनीदेखील स्वाक्षरी करुन दिला पाठिंबा; महाविकास आघाडीत नाराजी उघड
आ.मंगेश चव्हाणांंनी मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी विधानसभा गेटवर राबवली स्वाक्षरी मोहीम
भाजपाच्या सर्व आमदारांसह राष्ट्रवादी नेते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीदेखील स्वाक्षरी केल्याने उडाली खळबळ
चाळीसगाव प्रतिनिधी: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यासोबत आर्थिक व्यवहारांच्या आरोपावरून अटक करण्यात येऊन सध्या इडीच्या कोठडीत असलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी करत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी काल सकाळपासून विधानसभेच्या गेटवर भला मोठा फलक लावून स्वाक्षरी मोहीम राबविली.
यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाच्या जवळपास सर्वच आमदारांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आ.मंगेश चव्हाण यांच्या स्वाक्षरी मोहीमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.व जोरदार घोषणाबाजी करत देशाच्या दुष्मनांसोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
विरोधकांबरोबरच सत्ताधारी विधानसभा उपाध्यक्षांनी देखील केली स्वाक्षरी केल्याने खळबळ?
दरम्यान आ.मंगेश चव्हाण यांनी मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी राबविलेल्या या अनोख्या स्वाक्षरी मोहीमेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीदेखील यावेळी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेत स्वाक्षरी केल्याने खळबळ उडाली आहे. कोठडीत असलेले नवाब मलिक ज्या पक्षाचे नेते आहेत त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेते व विद्यमान विधानसभा उपाध्यक्षांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या मोहीमेत सहभागी होऊन पाठिंबा दिल्याने आता नव्या चर्चेला उधाण आले आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरुन सत्ताधाऱ्यांमधे एकमत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही मोहीम देशद्रोही शक्तींशी संधान साधणाऱ्या प्रवृत्ती विरोधात- आ.मंगेश चव्हाण
देशाचा क्रमांक एकचा शत्रू दाऊद इब्राहिम शी आर्थिक व्यवहार करणाऱ्या महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक च्या राजीनाम्यासाठी विधानसभेच्या गेटवर आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवली सदर मोहिमेत माझ्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर यांच्यासह सर्व आमदारांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दिला आहे.मी केलेल्या विनंतीनुसार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी देखील सही करून पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेदेखील मी आभार मानतो. ही मोहीम व मागणी कुठल्याही जाती अथवा धर्माच्या विरोधात नसून महाराष्ट्राच्या या भूमीत राहून व राज्याच्या सर्वोच्च सभागृहात मंत्री पद भोगून देखील देशद्रोही शक्तींशी संधान साधणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आहेत.
आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव
Comments
Post a Comment